हैदराबाद - तेलंगणामध्ये दोन ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. कचेगुडा रेल्वे स्थानकात सोमवारी (11 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन ट्रेनपैकी एक एमएफटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याने ट्रेनचे काही डब्बे रुळावरून घसरले. इंटरसिटी एक्स्प्रेस ही कचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती. त्याच प्लॅटफॉर्मवर एमएफटीएम ट्रेन आली आणि या दोन्ही ट्रेनची धडक झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लिंगमपल्ली-फलकनुमा ट्रेनचे तीन डब्बे तर कुर्नुल सिटी-सिकंदराबाद एक्स्प्रेसचे चार डब्बे हे धडक झाल्यावर रुळावरून घसरले आहेत. घसरलेले डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अशी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.