सिवनी : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई येथे मंगळवारी पहाटे गोमांस ठेवण्याच्या संशयापोटी जमावाने तीन आदिवासी युवकांना प्रचंड मारपीट केली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार अर्जुनसिंह काकोडिया यांच्या नेतृत्वात नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. तक्रारकर्ता व काँग्रेसने हल्ला करणारे आरोपी बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे.
मृताचे नाव संपतलाल बट्टी (रा. कुरई) व धनसाय इनवाती (रा. सिमरिया) आहे, तर जखमी युवकाचे नाव बृजेश बट्टी आहे. सिवनी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. के. मडावी यांनी सांगितले की, १५ ते २० लोक पीडितांच्या घरावर पोहोचले. गायीला मारल्याचा आरोप करीत जोरदार मारपीट केली. जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना दोघांचा मृत्यू झाला. कुरई पोलीस ठाण्यात २०हून अधिक लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. पीडितांच्या घरातून १२ किलो मांस मिळाले आहे.
- मृतांच्या वारसांना नोकरी व नुकसानभरपाई
सिवनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल फटिंग यांनी या हल्ल्यातील मृतक संपतलाल बट्टीच्या मुलीला आदिवासी कन्या आश्रमशाळेत तसेच सिमरिया येथील मृतक धनसाय इनवाती यांच्या मुलाला विजयपानी हायस्कूलमध्ये नोकरी देण्याचे आदेश दिले.
- बजरंग दलावर निर्बंध लावा
हल्ले करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ता होते. बजरंग दलावर प्रतिबंध लावण्यात यावा. पीडिताच्या कुटुंबीयांना एक कोटी व सरकारी नोकरी देण्यात यावी.
अर्जुनसिंह काकोडिया, आमदार, काँग्रेस
कठोर कारवाई व्हावी
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. आरोपींविरुद्ध कडक कारवाई व्हावी. पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी. जखमीवर सरकारी खर्चातून उपचार व्हावा. मृतक व स्थानिक लोकांनी सांगितले की, या घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी होते.
- कमलनाथ, अध्यक्ष, मध्य प्रदेश काँग्रेस