नवी दिल्ली: विश्व हिंदू परिषदेच्या(VHP) तक्रारीनंतर त्रिपुरामध्ये दोन महिला पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्या महिला पत्रकारांनीपोलिसांवर धमकावल्याचा आरोप केला आहे. पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांना धमकावले. सायंकाळी उशिरा त्या दोघींना ताब्यात घेण्यात आले. या पत्रकारांवर दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. विहिंप नेत्या कांचन दास यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
त्रिपुरा पोलिस महानिरीक्षक(कायदा आणि सुव्यवस्था) अरिंदम नाथ यांनी सांगितले की, पोलिसांनी समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा या दोन्ही महिला पत्रकारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यात खोट्या बातम्या प्रकाशित करुन जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नयेकेंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, त्रिपुरातील एका मशिदीची नासधूस आणि तोडफोड केल्याबद्दल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातम्या खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. काही सोशल मीडियात आरोप केल्यानुसार कोणतीही गंभीर दुखापत किंवा बलात्कार किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही बातमी नाही.
निवेदनात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, अलीकडच्या काळात त्रिपुरामध्ये कोणत्याही मशिदीचे नुकसान झाल्याची घटना समोर आलेली नाही. लोकांनी शांत राहावे आणि अशा खोट्या बातम्यांद्वारे दिशाभूल करू नये. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील काकरबन भागात एका मशिदीचे नुकसान झाल्याचे वृत्त पसरले आहे, हे अहवाल खोटे आणि चुकीचे आहेत.