पुलवामा : राजस्थानातील एका ट्रकचालकाची १४ आॅक्टोबर रोजी काश्मिरात शोपियानमध्ये अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरात चार हत्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पुलवामात एका बाहेरील मजुराची, तसेच बाहेरील ट्रकचालक, एक स्थानिक सफरचंद व्यापारी यांची हत्या झाल्याने तणाव आहे. दोन आठवड्यांत झालेल्या ५ हत्यांमुळे कामगार, बाहेरील लोकांतही भीती आहे.
५ आॅगस्ट रोजी काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत आहे, तसेच काश्मिरात दाखल झालेले बाहेरील मजूर सुरक्षेच्या कारणास्तव परत गेले आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूरचा रहिवासी २५ वर्षीय गोपाल कुमार कर्ण हा पुलवामात वीटभट्टीवर मजूर आहे. तो सांगतो, आपले वडीलही येथे वीटभट्टीवर काम करीत होते. ते आमच्या पूर्ण कुटुंबाला येथे घेऊन आले. माझ्या दहा महिन्यांच्या मुलाचाही जन्म येथीलच आहे. या ठिकाणी वीटभट्टीवर काम करणारे १४० हून अधिक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड भागातील आहेत. कामाच्या +शोधात ते काश्मिरात येतात. दोन कामगार एका दिवसात २००० विटा भाजू शकतात. त्याबदल्यात त्यांना प्रति दिन ५०० ते ७०० रुपये मिळतात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरीचे हे दर कमी आहेत. स्थानिक मजूर प्रति दिन १५०० रुपये घेतात. काश्मिरात ८३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतश्रीनगर : काश्मिरातील जनजीवन ८३ व्या दिवशीही विस्कळीतच होते. मुख्य बाजारपेठा बंद होत्या. काही भागात सकाळी काही तासांसाठी दुकाने उघडली होती. मात्र, ११ वाजता ही दुकानेही बंद झाली. थोड्या वेळातच या दुकानांत एकच गर्दी उसळली होती आणि रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॅफिक जाम होती. काश्मिरात अद्यापही इंटरनेट सेवा बंद आहे.