लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दोन वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आरसीआय) परिपत्रकात म्हटले आहे.
एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी)अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही तसा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून ४ वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
नव्या अभ्यासक्रमात काय?
- बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
- श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो.
- चार वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.