नवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात अडकलेले वायुदलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी आणि वकील गौतम खेतान यांची सीबीआयने बुधवारी चौकशी केली. अगुस्ता वेस्टलँड या ब्रिटनमधील कंपनीकडून १२ हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी झालेल्या ३६०० कोटी रुपयांच्या सौद्यातील लाचखोरीचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) त्यागी यांच्याभोवतीचा पाश आवळला आहे.ईडीकडून मोठ्या रकमांचा मागोवा घेण्यात आला असता लाच दिली गेल्याचा संशय बळावला. सीबीआयने बुधवारी जाबजबाब नोंदविताच त्या आधारावर आज गुरुवारी ईडीकडून एस.पी. त्यागी यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. चौकशीची पहिली फेरी पूर्ण होताच इम्मार एमजीएफ या रियल्टी कंपनीचे मालक श्रावण गुप्ता तसेच त्यागी यांच्या चुलत बंधूंनाही प्रश्नही विचारले जातील. त्यागी आणि खेतान यांनी बुधवारी सीबीआयच्या मुख्यालयात हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर ते डिसेंबर २००९ या काळात गुईडो हॅश्की हे इम्मारचे स्वतंत्र संचालक राहिल्यामुळे गुप्ता यांचे नाव समोर आले. खेतान आणि एस.पी. त्यागी यांच्या चुलत बंधूंच्या कंपन्यांना विदेशातून लाचेचा पैसा मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा ईडीने गेल्यावर्षी दाखल केलेल्याआरोपपत्रात केला होता. (वृत्तसंस्था)त्यागींवर तिसऱ्या दिवशीही सरबत्तीमाजी वायुदल प्रमुख त्यागी यांना लागोपाठ तिसऱ्या दिवशी जाबजबाबाला सामोरे जावे लागले. हा सौदा घडवून आणण्यासाठी लाच देण्यात आल्याचे इटलीच्या मिलान न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर प्रथमच खेतान चौकशीच्या घेऱ्यात अडकले आहेत. खेतान हे लाचेचा पैसा वळता करण्यात आला त्या एअरोमॅट्रिक्स या कंपनीचे माजी मंडळ सदस्य आणि वकील आहेत. इटलीचे दोन दलाल कार्लो गेरोसो आणि गुईडो हॅस्च्की यांच्याशी असलेल्या संबंधावर लक्ष केंद्रित करीत या दोघांना प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यागी, खेतान यांची सीबीआयकडून चौकशी
By admin | Published: May 05, 2016 2:49 AM