नवी दिल्ली, दि. 08 - देशात अनेकवेळा लोकांवर कथित भानामती केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, असाच काहीसा प्रकार दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये घडताना दिसून येत आहे. येथील महिलांनी असा दावा केला आहे की, अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर. उत्तरप्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. गुरुग्रामधील देवीलाल कॉलनीमधील लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वी महिलांचे केस कापल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे येथील महिला रात्री झोपताना डोक्याला कपडा बांधून झोपत आहेत. तर, परिसरातील काही लोक रात्री पहारा देत आहे. याचबरोबर पोलिसांकडून लोकांना अफवांवरती विश्वास ठेऊ असे आवाहन करण्यात येत आहे. हरियाणामधील फतेहाबाद जिल्ह्यातील महिलांनी असा दावा केला आहे की, दृष्ट आत्मा म्हणजेच भूतांकडून केस कापले आहेत. तसेच, परिसरातील लोकांनी सांगितले की, महिलांच्या वेण्या आमि केस कापल्याचा आठ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिने दिलेल्या माहितीनुसार, फतेहाबादच्या पोलीस आयुक्तांनी महिलांचे केस कापणा-या व्यक्तींची माहिती देईल, त्याला 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येईल असे जाहीर केले आहे.
घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम...काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत.
महिलांनी वेण्या घालणंच दिले सोडून...केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेण्या घालणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.