नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागरण करण्यात आले, तरीही अजूनही काही गैरसमज कायम आहेत. यातूनच सॅनिटायझर पिणे, जंतुनाशक अंगावर शिंपडणे, खाद्य पदार्थांमध्ये ब्लीच पावडर मिसळणे आदी धोकादायक प्रकार आजही केले जात आहेत; परंतु हे जिवावर बेतू शकते. चुकीची माहिती; तसेच अफवांना बळी पडल्याने या घटना घडत आहेत.
कोरोनापासून बचावासाठी लोक भीतीपोटी घातक पावले उचलत आहेत. अमेरिकेत अनेक लोकांनी कोरोनापासून बचावासाठी खाद्य पदार्थात चक्क ब्लीच मिसळले आहे. अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीकडून ५०० लोकांच्या केलेल्या पाहणीतून अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. घर साफ करण्यासाठी वापरले जाणारे क्लिंजर अनेकांनी अवयव स्वच्छ करण्यासाठी वापरले आहे. ३९ टक्के लोकांना कोरोनापासून बचावासाठी साफसफाईच्या वस्तू चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे मान्य केले आहे.सर्वेक्षणात सहभागी १८ टक्के लोकांनी घरगुती क्लिनरने त्वचा स्वच्छ केल्याचे सांगितले आहे, तर १० टक्के वयस्कर लोकांनी स्वत:वर जंतुनाशक शिंपडल्याचे मान्य केले आहे.6 टक्के लोकांनी क्लिनरचे सेवन केल्याचे सांगितले आहे. 4 टक्के लोकांनी दारूच्या नशेत साबणाचे पाणी, ब्लीच तसेच किटाणूनाशक पाण्यात मिसळूम पिल्याचे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)जागतिक आरोग्य संघटना; तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने वेळोवेळी कोरोनापासून बचाव करताना घातक पदार्थ न वापरण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. भारतातही शरीरातील कोरोना नष्ट करण्याच्या नादात लोकांनी सॅनिटायझर पिण्याच्या घटना घडल्या आहेत.