फेसबूक, यूट्युब, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अधिकाधिक प्रेक्षक आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे स्टंट करत असतात. मात्र एका यूट्युबरने या लाईक्स आणि ह्युज मिळवण्याच्या नादात धक्कादायक कृत्य केले. या यूट्युबरने रेल्वे ट्रॅकवर फटाके फोटून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हा व्हिडीओ व्हायरल करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या बहुतांश नेटिझन्सनी त्याची चांगलीच कान उघाडणी केली एवढंच नाही, तर रेल्वेनेही त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Stupid DTS नावाच्या यूट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ राजस्थानमधील अजमेर ते फुलेरा या रेल्वेमार्गादरम्यान चित्रित करण्यात आला होता. त्यामध्ये गमतीदार प्रयोग या नावाने रेल्वे ट्रॅकवर फटाके फोडतानाचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रेन्स ऑफ इंडिया या अकाऊंटवर हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला. तसेच फटाके फोडणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यूट्युबर रेल्वे रुळांवर फटाके फोडत आहेत. अशा प्रकारांमुळे आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या ट्विटमधून करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर पश्चिम रेल्वे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जयपूर यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे.
स्टुपिड डीटीएस नावाचा हा चॅनेल चालवणाऱ्या तरुणाचं नाव यश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यानेच रेल्वे रुळांवर फटाके फोडून तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, चौफेर टीका झाल्यानंतर या तरुणाने आपल्या यूट्युब चॅनेलवर दुसरा व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, आमच्याकडून जे काही घडलंय ते अजाणतेपणातून घडलं आहे. त्यासाठी आम्ही भारताची जनता, भारतीय रेल्वे आणि आरपीएफच्या जवानांची माफी मागतो. आम्हीही रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वेच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. आमच्याकडून जे काही घडलं त्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतोय. आमची आरपीएफ आणि रेल्वेला विनंती आहे की त्यांनी आम्हाला एक वेळ माफ करावं, अशी विनंती या तरुणाने केली आहे.