ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी सुरू होणारी 30 सेकंदांच्या जाहिरातीतून लवकरच तुम्हा-आम्हा सर्वांची सुटका होणार आहे. यू-ट्युबवर एखादा व्हिडीओ पाहायचा असले तर त्यापूर्वी 30 सेकंदाची वगळता न करता येणारी जाहिरात जबरदस्तीने पाहावी लागते. 30 सेकंदात यू-ट्युब जणू युजर्सच्या संयमाची परीक्षाच घेत आहे, असे वाटते.
मात्र, पुढील वर्षापासून यू-ट्युब अशा जाहिराती बंद करणार असल्याची माहिती आहे. ही बातमी तमाम यू-ट्युब युजर्ससाठी दिलासादायक आहे, असेच म्हणावे लागेल. साधारणतः यू-ट्युबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी 30 सेकंदांची (मस्ट) जाहिरात सुरू होते, ती वगळता येत नसल्याने जाहिरात पूर्ण पाहण्याशिवाय पर्याय नसतो.
जे युसर्ज नेहमी यू-ट्युबवर सक्रीय आहेत, त्यांना या जाहिरातींची कटकट सहन करावी लागते. कारण दुसरा कोणताच पर्याय नसल्याने 30 सेकंदांची पूर्ण जाहिरात पाहणं त्यांना भाग असते. यावर यू-ट्युबने असे सांगितले आहे की, युजर्संना दिलासा देण्यासाठी आम्ही या जाहिराती हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यू-ट्युबला या जाहिरातींमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा होतो. साहजिकच, या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
मात्र, हा तोटा भरुन काढण्यासाठी यू-ट्युबकडून अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. 30 सेकंदांऐवजी आता 20 सेकंदाची जाहिराती दाखवल्या जातील, असे बोलले जात आहे. याव्यतिरिक्त, ज्यांना यू-ट्यूबवर जाहिराती पाहणं पसंत नाही, ते यू-ट्यूबची प्रीमियम योजना यू-ट्यूब रेडचा लाभ घेऊ शकता. दरम्यान, ही योजना सध्या काही निवडक देशांमध्येच उपलब्ध असून ज्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो.