नवी दिल्ली : केरळमधील पूरग्रस्तांना संयुक्त अरब अमिराती (युएई)च्या 700 कोटींच्या मदत जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा यूएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी केला. यावरुन भाजपाने केरळमधील डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाला बदनाम करण्यासाठी केरळमधील डाव्या सरकारने यूएईकडून मदत मिळाल्याचे सांगितले, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
याप्रकरणी भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे. ही एक त्रासदायक बाब आहे. कम्युनिस्ट-इस्लामिक मिळून एका दुस-या देशाकडून मिळणा-या मदतीवर खूश आहेत. जी मदतच दिली नाही. दुसरीकडे सेवा भारती सारख्या संघटनांकडून मिळणारी मदत नाकारली जात आहे. कारण, त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, असे भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केरळमधील पूरग्रस्तांना परदेशातील मदत घेणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यानंतर ज्या यूएईकडून 700 कोटींच्या मदतीवरून देशात गदारोळ माजला त्या मदतीबाबत मोठा खुलासा करण्यात आला. भारतात अशा मदतीवर वादविवाद उत्पन्न झाले जी कधी जाहीर केली गेली नाही, असे स्पष्टीकरण युएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी दिले. अलबन्ना यांनी केरळला मदत मिळेल, मात्र 700 कोटींचा आकडा अधिकृत जाहीर झालेला नाही. यूएईकडून किती मदत मिळेल याबाबत अद्याप ठरलेले नाही. केरळमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्यांचे काम अद्याप सुरु आहे. केरळमधील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी निधी जमविण्याचे कामही सुरु आहे, असे सांगितले.