उबर कॅब ड्रायव्हरकडून निरर्थक मेसेज मिळाल्यानंतर, एका महिलेने 'गंभीर चिंता' व्यक्त केली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट 'X' वर तिने आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. या घटनेमुळे हताश आणि अस्वस्थ झालेल्या महिलेने उबर राइडनंतर कॅब कंपनीला ड्रायव्हरकडून मेसेज मिळाल्याची त्रासदायक परिस्थिती कळवली आहे. तिच्या या पोस्टवर कंपनीकडून उत्तरही आलं आहे.
महिलेने लिहिलं आहे की, "या घटनेमुळे मला फक्त अस्वस्थ वाटलं नाही तर सुरक्षेची गंभीर चिंताही निर्माण झाली आहे. माझा ठाम विश्वास आहे की Uber हे असं व्यासपीठ असावं की जेथे ग्राहक विशेषत: महिला, चालकांवर आणि संपूर्ण अनुभवावर विश्वास ठेवू शकतील. या घटनेमुळे हा विश्वास डळमळीत झाला आहे आणि मी उबरवर वाहतुकीसाठी अवलंबून असलेल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंतित आहे."
"मी तुम्हाला विनंती करते की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित निर्णायक कारवाई करा, संबंधित ड्रायव्हरची ओळख पटवा आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खात्री करण्यासाठी योग्य उपाययोजना करा. Uber प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि मला आशा आहे की तुम्ही ही तक्रार गांभीर्याने घ्याल."
भूमिकाने ड्रायव्हरसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉटसह ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्क्रीनशॉटमध्ये असं दिसून आलं आहे की, मेसेज पाठवण्याव्यतिरिक्त, या व्यक्तीने भूमिकासोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. ही पोस्ट काही तासांपूर्वी शेअर करण्यात आली होती. शेअरवर बर्याच कमेंट्स आल्या आहेत, ज्यात उबरच्या विधानाचाही समावेश आहे.
Uber ने X वर एक मेसेज शेअर केला ज्यामध्ये , "हाय भूमिका, समस्येबद्दल ऐकून वाईट वाटलं. तुम्ही कृपया तुमच्या खात्याशी संबंधित मोबाईल नंबर डायरेक्ट मेसेजद्वारे आमच्यासोबत शेअर करू शकता का? आम्ही त्याचा पाठपुरावा करू" असं लिहिलं आहे
कंपनीने यानंतर पुन्हा प्रतिसाद दिला "हॅलो भूमिका, आमच्याशी बोलल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ही परिस्थिती तुमच्यासाठी किती वेदनादायी आहे हे आम्हाला समजलं आहे. आमची टीम सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी एका अपडेटसह संपर्क करू. या संदर्भात तुमच्या समजुतीचे आम्ही कौतुक करतो" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.