सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका उबेर ऑटो ड्रायव्हरच्या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या लेकीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हा बाप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जगभरातील प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या खूप शिकावं आणि आयुष्यात काहीतरी चांगले करावं ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. मुलांच्या प्रत्येक आनंदासाठी पालक शक्य तितके प्रयत्न आणि परिश्रम करण्यास तयार असतात. उबेर ऑटो चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदाची काळजी घेणाऱ्या राकेश यांच्या बाबतीतही असंच काहीसं आहे.
लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिजीत मुथा नावाच्या युजरने राकेश नावाच्या एका उबेर ऑटो ड्रायव्हरची गोष्ट आपल्या अकाऊंटवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी पालक किती मदत करतात. अभिजीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्याने आदल्या दिवशी एक उबेर ऑटो बुक केली, जी राकेश नावाचा ड्रायव्हर चालवत होता. याच दरम्यान ड्रायव्हरने त्याचा यूट्यूब व्हिडीओ थांबवला आणि नेव्हिगेशन सुरू केले.
काही वेळातच थांबलेला व्हिडीओ पुन्हा प्ले होऊ लागला, ते पाहून अभिजीतने उबेर ऑटो चालकाला विचारले की तो काय पाहत आहे? यावर उबर ऑटो चालक राकेशने उत्तर दिले की, तो चालू घडामोडी आणि अर्थशास्त्राची माहिती घेत आहे. यावर अभिजीतने कोणत्या परीक्षेची तयारी करताय? असा प्रश्न विचारला. त्यावर राकेश म्हणाला की, माझी मुलगी यूपीएससीची तयारी करत आहे, मी पण तिला थोडी मदत करतो, रोज संध्याकाळी जेव्हा ती लायब्ररीतून येते तेव्हा आम्ही अशी चर्चा करतो. अभिजीतने उबेर ऑटो ड्रायव्हरच्या या गोष्टी त्याच्या लिंक्डइन अकाउंटवर शेअर केल्या आहेत, ज्या आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट पाहिली असून लाईक केलं आहे. या पोस्टला आतापर्यंत एक लाख लोकांनी लाईक केलं आहे, तर 1,755 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच वेळी, या पोस्टवर 1,583 लोकांनी कमेंट केल्या आहेत. पोस्ट पाहिल्यानंतर यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत आणि उबर ऑटो चालकाचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'पालक फक्त हेच असतात. आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असतात. देव तिला आशीर्वाद देवो' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"