राजस्थानमध्येगणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. उदयपूर शहरात अनेक ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील बापू बाजार येथे विराजमान गणपतीला तब्बल 33,33,333 रुपयांच्या नोटांचा ड्रेस करण्यात आला. नोटांची ही आगळीवेगळी सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गणेश मंडपात गर्दी केली आणि बाप्पाचे दर्शन घेतले.
उदयपूरच्या बापू बाजारात श्री स्वस्तिक विनायक गणपती मंडळाने गणपतीची स्थापना केली आहे. येथील गणपतीला उदयपूरचा राजा असेही म्हणतात. गणपती मंडळाचे पदाधिकारी दररोज गणपतीसाठी खास पोशाख करतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भक्तीभावे उदयपूरचा राजा गणपती स्थापित केला जातो. उदयपूरच्या राजाला नोटांच्या या खास सजावटीसाठी विनायक गणपती मंडळाचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होते. गेल्या काही दिवसांपासून 2000, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांपासून गणपती बाप्पाचे कपडे बनवण्याची तयारी सुरू होती.
गणपतीसाठी धोतर आणि मुकुट 2000 च्या नोटेपासून बनवण्यात आले आहे. 500 च्या नोटांपासून हात आणि चिलखतीचे कपडे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 100, 200 आणि 500 च्या नोटांचा बनलेला हार गणपती बाप्पाला घालण्यात आला आहे. नोटांची ही खास सजावट पाहण्यासाठी हजारो भाविक गणपती मंडपात भेट देत आहेत. बुधवारी रात्री गणेशाची महाआरतीही करण्यात आली. त्यातही हजारो लोक उपस्थित होते.
बुधवारी रात्री बापू बाजार येथे झालेली प्रचंड गर्दी पाहता गणपती भक्तांना त्रास होऊ नये, म्हणून सायंकाळी वाहतूक वळवण्यात आली. गणपती उत्सवाच्या 10 दिवसांसाठी दररोज संध्याकाळी, मोठ्या संख्येने लोक बापू बाजारमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचतात. अनोखा देखावा, गणपतीची विशेष सजावट केली जाते तेव्हा भक्तांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे काही तास वाहतूक वळवण्यात आली.