मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे, उदयपूर येथील कन्हैया लाल नावाच्या एका टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली. कन्हैया लाल यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत. यामुळे, आता येथील काँग्रेसचे गेहलोत सरकार डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी अॅक्शन घेत उदयपूर अॅडिशनल एसपी अशोक कुमार मीणा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर गुरुवारी रात्री उशिरा उदयपूर रेंजचे आयजी आणि एसएसपी यांची बदली करण्यात आली आहे.
उदयपूरचे अॅडिशनल एसपी निलंबित - राज्यातील गृह विभागाचे संयुक्त सचिव (पोलीस) जगवीर सिंह यांनी उदयपूरचे अॅडिशनल एसपी अशोक कुमार मीणा यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. मात्र, या आदेशात त्यांच्या निलंबनाचे कारण सांगण्यात आलेले नाही. मात्र, टेलर कन्हैयालाल साहू यांच्या हत्येप्रकरणात (Udaipur Tailor Murder Case) निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एएसआय यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. कन्हैया लाल साहू यांची मंगळवारी रात्रीच्या सुमारास 2 जिहाद्यांनी, दुकानात शिरून चाकूने गळाकापून हत्या केली होती.
दुकानापासून जवळपास 500 मीटर अंतरावर सापडली अॅक्टिव्हा -राजस्थान सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासात मृत कन्हैया लाल साहू यांच्या दुकानापासून सुमारे 500 मीटर अंतरावर एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा आढळून आली आहे. आरजे-२७-बीएस-१२२६, असा या अॅक्टिव्हा गाडीचा नंबर असल्याचे सांगण्यात येत आहे. गौस मोहम्मदच्या नावावर या अॅक्टिव्हाची नोंद आहे. हत्येतील आरोपी गौस मोहम्मद रियाज अत्तारी हा घटनेसाठी याच अॅक्टिव्हावर बसून आल्याचे बोलले जात आहे.
राजस्थानातील अनेक शरहरांत आज बंदचे आवाहन - कन्हैयालाल यांच्या हत्येविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या हत्याकांडाच्या विरोधात आज राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आज येथील किशनगड, अलवर, करौली, अजमेर आणि हिंडन शहरातील बाजारपेठा बंद राहतील. भाजपच्या आवाहनावरून या शहरांतील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.