मुंबई -राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत न होता, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात सकाळी ११ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यसभा खासदारांच्या या शपथविधी सोहळ्यात भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असे म्हटले होते. त्यावरुन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली.
देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेल्या 62 खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात नवनिर्वाचित या खासदारांचा शपथविधी संभारंभ सोहळा पार पडला. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्याच सदस्यांना शपथ देण्यात आली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शपथेशेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी शपथ घेताना दिलेल्या घोषणेवरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही. त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. नो अदर स्लोगन आर अलाऊड इन द हाऊस, कीप दॅट इन माईंड, नीव मेंमर फॉर फ्युचर, असे व्यंकय्या नायडूंनी म्हटले.
उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शपथविधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर, सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होत असून व्यंकय्या नायडूंचा शिवभक्तांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. व्यकंय्या नायडूंनी उदयनराजेंना दिलेली समज शिवभक्तांना रुचली नसून त्यांनी नायडू यांचा फेसबुकवरुन व सोशल मीडियातून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी पवारांना लक्ष्य केले. 'भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर साधारण प्रतिक्रिया दिली.