नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी दिली आहे. तसेच व्यंकय्या नायडूंना प्रश्न विचारण्याऐवजी, ज्यांनी प्रश्न उपस्थित केला त्या पक्षाच्या खासदारांना विचारावा, शरद पवार यांना विचारावा? असेही उदयनराजेंनी म्हटले. तर, संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते महान व्यक्ती असल्याचा उपरोधात्मक टोलाही उदयनराजेंनी लगावला.
राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु झालेल्या राजकारणावर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शपथविधीवेळी काय घडले, यासंदर्भात सांगितले. "सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही, त्याला घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता", असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी बोलताना, भाजपला लक्ष्य केलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. याशिवाय, शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदीची अद्याप घोषणा नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी उपरोधात्म टीका केली आहे.
महान व्यक्तीय बाबा... राजकारण करण्यासाठी आमच्याकडे, शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहेत की नाहीत, याचे दाखले मागितले त्यांनी अशी मागणी करावी, व्वा?. मी त्यांच्याबद्दल काही उत्तर देणार नाही, काही लोकांना लाईमलाईटमध्ये यायचं असतं, असे म्हणत संजय राऊत यांच्या स्टेटमेंटवर उत्तर देण्याचं उदयनराजेंनी टाळलं. मात्र, त्यांच्याकडून शिवसेना टार्गेटही करण्यात आलं.
शिवसेना हा महाराजांच्या नावावर आधारीत पक्ष आहे, यापूर्वीही जितेंद्र आव्हाड आणि त्या लोकांनी मला डिवचलं. त्यामुळे, मी त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब?. कारण, शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे होती, पण तिथं बाळासाहेबांची प्रतिमा वर आहे, यावर का बोलत नाही, असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच, जर बाळासाहेब मोठे असतील तर शिवसेनेनं ठाकरेसेना हे नाव ठेवावं. मी द्वेषापोटी म्हणत नसून आय एम टॉकींग अबाऊट लॉजिक, असंही उदयनराजेंनी म्हटलं.