‘भाजप नेत्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा', मुलाच्या बचावासाठी सरसावले CM एमके स्टॅलिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 02:06 PM2023-09-07T14:06:28+5:302023-09-07T14:07:03+5:30
मुलगा उदयनिधी यांच्या वक्तव्याचा बचाव करत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल.
Udaynidhi Stalin : तामिळनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे सुपूत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याने मोठा वाद सुरू झाला आहे. आता द्रमुक सुप्रीमो एमके स्टॅलिन आपल्या मुलाच्या वक्तव्याचे उघडपणे समर्थन करत थेट केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उदयनिधीने सनातन धर्मावर आपले मत मांडले, त्यात काहीही चुकीचे नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
संबंधित बातमी- सनातन धर्म HIV, कुष्ठरोगासारखा, उदयनिधींनंतर DMKच्या ए. राजांचं प्रक्षोभक विधान
तामिळनाडूचेमुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले की, 'उदयनिधी सनातन धर्मातील त्या मुद्द्यांवर भाष्य केले, ज्यामध्ये अनुसूचित जाती, आदिवासी, महिलांशी गैरवर्तन केले जाते. त्यांचा उद्देश कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक भावनांचा अपमान करणे नव्हता. देशातील अनेक बड्या नेत्यांनी मनुवाद, सनातन धर्मावर वेळोवेळी टीका केली आहे. आपण चंद्रावर पोहोचलो, पण तरीही काही लोक जातीत अडकले आहेत. उदयनिधीचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत आहे. उदयनिधीने कधीही वंशसंहार हा शब्द वापरला नाही.'
2/2 pic.twitter.com/16BrQEcp7k
— DMK (@arivalayam) September 7, 2023
भाजप नेत्यांनी भागवतांचा सल्ला घ्यावा
स्टॅलिन पुढे म्हणतात, 'उदयनिधीच्या वक्तव्याची माहिती न बाळगता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांनी विधाने करण्यास सुरुवात केली आहे. यूपीमध्ये एका साधूने उदयनिधींचे फोटो जाळला, त्यावर सरकारने कारवाई केली का? पंतप्रधानही त्यांच्या मंत्र्यांना या मुद्द्यावर बोलण्यास सांगत आहेत. पंतप्रधानांनी या प्रकरणावर आपल्या मंत्र्यांना बोलण्यास सांगणे चुकीचे आहे.'
संबधित बातमी- "उदयनिधींना थप्पड मारा अन् मिळवा 10 लाखांचे बक्षीस", विजयवाडामध्ये लागले पोस्टर्स
'आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही म्हटले होते की, आपण समाजव्यवस्थेत आमच्याच लोकांना मागे टाकले आहे. आपण त्यांची 2000 वर्षे काळजी केली नाही. जोपर्यंत आपण त्यांना बरोबरीत आणत नाही, तोपर्यंत विशेष सूट (आरक्षण) देणे आवश्यक आहे. जर भाजपला उदयनिधी काय बोलले हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा,' असंही स्टॅलिन आपल्या निवेदनात म्हटले.
Let us resolve to work for the victory of the ideologies of Periyar, Anna, Kalaignar and Perasiriyar. Let Social Justice flourish forever. pic.twitter.com/Eyc9pBcdaL
— Udhay (@Udhaystalin) September 7, 2023
उदयनिधीचे स्पष्टीकरण
एमके स्टॅलिन यांच्या आधी उदयनिधी स्टॅलिन यांनीही त्यांच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण सादर करत पत्र जारी केले. उदयनिधी म्हणाले की, भाजपच्या लोकांनी माझ्या विधानाचे चुकीचे वर्णन करुन जेनोसाईड हा शब्द लोकप्रिय केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमित शहा यांसारखे मोठे नेते आणि अनेक भाजपशासित राज्ये माझ्यावर टीका करत आहेत, तेही एका फेक न्यूजमुळे. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, सर्वांना समान मानतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ भाषणबाजी आणि खोट्या आरोपांच्या जोरावर मोदी आणि कंपनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 9 वर्षात त्यांच्या सरकारने काहीही केले नाही आणि अशा प्रकारे वाद निर्माण करून जनतेला प्रश्नांपासून वळवले आहे,' असे उदयनिधी म्हणाले.