'आधी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखा', भाजप नेत्याचे उदयनिधी स्टॅलिनला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:51 PM2023-09-04T17:51:02+5:302023-09-04T17:53:10+5:30
'सनातन हजारो वर्षांपासून अस्तित्वात, मुघल, ईस्ट इंडिया कंपनी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकही सनातनाला हात लावू शकले नाहीत.'
Udaynidhi Stalin on Sanatan remarks: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद सुरू झाला आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी त्यांना आव्हान दिले. ते म्हणाले, मी उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान देतो की, त्यांनी आधी स्वतःच्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखावे.
सनातन हजारो वर्षांपासून...
उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य बालिश असल्याचे सांगत अण्णामलाई म्हणाले, उदयनिधी हे त्यांचे वडील आणि आजोबांमुळेच या पदावर आहेत. सनातन धर्म वर्षानुवर्षे चालत आलेला आहे आणि यापुढेरी राहील. मुघल, ईस्ट इंडिया कंपनी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकही सनातनाला हात लावू शकले नाहीत, मग तो कोण कुठला आला.
सर्व मर्यादा ओलांडल्या
अन्नमलाई पुढे म्हणाले, ते सत्तेत आहेत, म्हणून त्यांना वाटते की, ते खूप शक्तीशाली आहेत. यामुळेच त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. उदयनिधींच्या वक्तव्यावेळी मंदिर प्रशासन मंत्रीदेखील मंचावर उपस्थित होते याचाच अर्थ ते मंदिरं आणि लोकांच्या धार्मिक प्रथा नष्ट करणार आहे. यावरुन त्यांची हिंदुविरोधी मानसिकता दिसून येते. उदयनिधींना आव्हान देतो की, त्यांनी आधी त्यांच्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखावे.
राहुल गांधींसारखे शौर्य दाखवण्याचा प्रयत्न
अन्नमलाई पुढे म्हणाले, उदयनिधी हे राहुल गांधींसारखे धाडसी दिसण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्यांचेच सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्याविरोधात पोलिसांना कोणतीही तक्रार करणार नाही. राज्यातून द्रमुकचा नायनाट होण्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. सध्याच्या पिढीला ते मान्य नाही, लोक आता द्रमुकला नाकारणार आहेत.
निवडणुकीत डीएमकेला स्वीकारणार नाही
लोकांना अशी भाषा मान्य नाही. सनातन धर्म सर्वांना एकत्र आणतो, हेच या धर्माचे सौंदर्य आहे. द्रमुक हा पूर्णपणे हिंदूविरोधी आणि तुष्टीकरणावर आधारित पक्ष आहे. या वक्तव्यावर संपूर्ण भारतातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. येत्या निवडणुकीत देश आणि तामिळनाडूची जनता द्रमुकला स्वीकारणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.