नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे आजपासून ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. येत्या ८ ऑगस्टपर्यंत ठाकरे कुटुंब दिल्लीत असणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यातून महाराष्ट्र हिताबाबत चांगली व्यापक चर्चा होईल असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय दिल्लीत खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची भेट होईल. राज्यातील जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा बैठकीत केली जाईल. लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांचा भर आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचीही भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्यांचे दिल्लीत स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय राऊत, आमदार अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंसह आमदार आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत बैठक होणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्लीत पोहचले. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा पूर्णत: राजकीय असणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम असणार आहे. पुढचे ३ दिवस ते इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधींसोबत त्यांनी भेट घेतली. केजरीवाल यांच्या कुटुंबालाही ठाकरे भेटले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला जे यश मिळाले, त्यात महाराष्ट्रात मविआला मोठे यश मिळाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआची व्यूहरचना आखण्यात सुरुवात झाली आहे.