मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेना संपलीय, असे उद्गार काढले होते. तसेच, भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार, असेही म्हटले होते. नड्डा यांच्या या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. त्यांनी शिवसेना संपवूनच दाखवावी, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिले. त्यानंतर, आता सामनातून शिवसेनेनं नड्डा यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. तसेच, कावळ्याच्या शापाने गाय मरण नसते, असा टोलाही नड्डा यांना लगावला आहे.
भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. आता, नड्डा यांच्या भाषेत अहंकार आल्याचे सांगत शिवसेनेनं त्यांचा मुखपत्रातून समाचार घेतला आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे , असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण, त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नड्डा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
तसेच, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही, अशा शब्दात भाजपला सुनावले.
सब घोडे बारा टके, नड्डांचे विधान अहंकारी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत. नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात.
तेव्हा मोदींच्या बाजुने एकमेव बाळासाहेब होते
संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा 'राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,' असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे. भारत हा सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे व मोदी प्रधानजी आहेत. ते लोकशाही मार्गाने निवडून आले. लोकांचा पाठिंबा मिळाला तर त्यांनी पुन्हा निवडून यावे, पण आम्हीच निवडून येऊ व आमच्यासमोर विरोधी पक्षच शिल्लक ठेवणार नाही, ही भाषा लोकशाहीस मारक आहे.