नवी दिल्ली-
राज्यात शिवसेनेला मोठा हादरा बसल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आलं आणि त्यापाठोपाठ आता दिल्लीतही शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज दिल्लीत महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या खासदारांनी राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून नियुक्ती केली. खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी मोठे गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.
"उद्धव ठाकरेंनाही भाजपासोबत युती हवी होती. त्यांनी तसं आम्हाला बैठकीत बोलून दाखवलं होतं. मी माझ्यापरीनं युतीसाठी प्रयत्न केले आहेत. आता तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा असं आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे", असं राहुल शेवाळे म्हणाले.
"ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं होतं. २१ जून रोजी ही बैठक झाली होती. तेव्हाही आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना भाजपानं मुख्यमंत्री केलं तर नक्कीच मी तुमच्या भूमिकेचं स्वागत करेन आणि युती करू असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही तेव्हा तयार झालो. या बैठकीला तेव्हा संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतरही खासदार उपस्थित होते", असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.