अयोध्या - राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. रविवारी (25 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांची अयोध्येत रॅली निघणार आहे. शिवाय, याच दिवशीच विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे. एकूणच राम मंदिर निर्माणावरुन पुन्हा राजकारण तापू लागले आहे.
(राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला )
या राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येत ब्ल्यू येलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत.
(Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान)
दोन दिवसांत अयोध्येत कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून केंद्रीय राखीव पोलीस, राज्य पोलीस आणि अन्य निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वादग्रस्त रामजन्मीभूमीच्या विद्यमान स्थितीत कोणीही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तात्काळ रोखण्यात यावे, असे आदेश सुरक्षा दलांना सरकारकडून देण्यात आले आहेत.
मुस्लिम कुटुंबांचे स्थलांतर
परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली असतानाही विश्व हिंदू परिषदेनं मोठा रोड शो केला आणि याद्वारे रविवारी होणाऱ्या धर्मसंसदेला आपला पाठिंबा जाहीर केला.
-विहिंपने अयोध्येच्या मुस्लीम वस्त्यांमधून रोड शो केला. त्यावेळी तिथे बाका प्रसंग उद्भवू नये म्हणून बंदोबस्त पाळण्यात आला.
- अनुचित प्रकार घडण्याच्या भयानं काही मुस्लिम कुटुंबे आपली घरेदारे तात्पुरती सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला गेली आहेत, असे नगरसेवक हाजी असद यांनी सांगितले.
- अयोध्येत नेमके काय घडणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.