अयोध्या : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिराबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच, भाजपा आणि हिंदुत्व वेगळे आहे. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपाला सोडले आहे हिंदुत्व नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर 'रामबाण' सोडला.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, "मी राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतो. तसेच, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने या ठिकाणी जागा दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस आहे." याचबरोबर, भाजपा आणि हिंदुत्व वेगळे आहे. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपला सोडले आहे हिंदुत्व नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. तसेच महाराष्ट्रातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालत आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्या काही दिवसांत मी तीन वेळा अयोध्येत आलो आहे. शिवसेनेची मागणी होती सरकारने विशेष कायदा बनवून राममंदिर बांधावे, पण कायदा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री होईन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण, तसे झाले. मी येथे नियमित येणार आहे. शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोना व्हायरमुळे शरयू नदीची आरती करू शकत नाही. पण, यासाठी मी पुन्हा येईन."