मुंबई - कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल. मात्र, 8 मे रोजी कर्नाटकमध्ये एका फ्लॅटमध्ये 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली. यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकारावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा व काँग्रेसवर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.
''आता ‘शाई’चे राज्य संपले, पण भाजप ‘ईव्हीएम’ मशीनचा घोटाळा करून निवडणुका जिंकत आहे. त्यात आता बोगस ‘व्होटर्स कार्ड’ची भर पडली. म्हणजे खुर्चीवर बसलेल्यांचे फक्त मुखवटे बदलले, चेहरे तेच आहेत. भाजपने काँग्रेसचा पराभव केला नाही, तर काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि विजय मिळविले. भाजपने काँग्रेसला जिवंत ठेवले आहे ते असे. ‘काँगेसमुक्त भारता’साठी भाजपने केलेल्या या त्यागाचे मोल अनमोल आहे. त्यासाठी भाजपची पाठ थोपटावीच लागेल!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?भारतीय जनता पक्षाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी प्रकरणे रोजच समोर येत आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा श्रीमान मोदी यांनी दिला खरा, पण काँग्रेस संपत आली असली तरी काँग्रेसचे विचार संपताना दिसत नाहीत. कारण खुद्द भाजपनेच आता काँग्रेस संपूर्ण आत्मसात करून काँग्रेसला मुक्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. कर्नाटक विधानसभेचे मतदान तोंडावर येत असतानाच बंगळुरूमधील एका फ्लॅटवर दहा हजार बोगस मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. एका मतदारसंघात सापडलेले हे घबाड असून इतर अनेक मतदारसंघांतही बोगस आय.डी. कार्डच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया कोण राबवत आहे, हा प्रश्न उभा राहिला आहे. बंगळुरूतील दहा हजार बोगस आय.डी. कार्डच्या विरोधात काँग्रेसने आता भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. हा जो ‘व्होटर फर्जीवाडा’ उघड झाला आहे तो पाहता कर्नाटक निवडणुकीची पातळी किती खाली घसरली आहे ते दिसून येते. पैशांचा वारेमाप वापर तर सुरूच आहे. हा इतका पैसा भाजपवाल्यांकडे येतो कुठून हे गौडबंगाल राहिले नसून सत्य काय ते सगळय़ांनाच कळले आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही निवडणूक आली की, ‘टाकसाळी’ खुल्या होऊन नोटांचा प्रवाह धो धो वाहू लागतो.
जणू कुटीर उद्योगांप्रमाणे घराघरात नोटछपाईचे उद्योग ‘मुद्रा’ बँकेने सुरू केले आहेत. हे पूर्वी काँग्रेस पक्ष करीत होता. आता काँग्रेसची कला भाजपने ‘आत्मसात’ केली आहे. एवढेच कशाला, ज्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा हा सगळा आटापिटा सुरू आहे त्या निवडणुकीसाठी भाजपने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तोदेखील काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची ‘कॉपी’ असल्याचा आरोप होतच आहे. राहुल गांधी यांनीही भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्याची नक्कल केल्याचा उघड आरोप केला आहे. थोडक्यात, पडेल ती किंमत मोजून निवडणुका जिंकायच्याच या काँग्रेसच्या धोरणावर पाऊल ठेवूनच भाजप ‘कदम कदम’ आगे बढत आहे. यापद्धतीने आपलेच विचार आणि कार्य पुढे नेणाऱ्या भाजपच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल. काँगेसने त्यांच्या काळात अनेक निवडणूक घोटाळे केले. इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने जिंकल्या तेव्हाही ‘त्यांचा विजय खरा नाही, विजय बाईचा की शाईचा?’ असा फटकारा शिवसेनाप्रमुखांनी मारला होता. आता ‘शाई’चे राज्य संपले, पण भाजप ‘ईव्हीएम’ मशीनचा घोटाळा करून निवडणुका जिंकत आहे व सध्याच्या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.
जोपर्यंत ‘ईव्हीएम’ मशीन आहे तोपर्यंत मोदींचा पराभव होणार नाही, असे बोलणे हा लोकशाहीचा पराभव आहे. त्यात आता बोगस ‘व्होटर्स कार्ड’ची भर पडली. म्हणजे खुर्चीवर बसलेल्यांचे फक्त मुखवटे बदलले, चेहरे तेच आहेत. भाजपने काँग्रेसचा पराभव केला नाही, तर काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि विजय मिळविले. म्हणजे शेवटी जिंकले ते काँगेसवालेच. फक्त मेकअप करून ते भाजपात आले व त्यांच्या बळावर भाजप सत्तेवर आली. त्रिपुरात संपूर्ण तृणमूल काँग्रेस त्यांच्या झुंडशाहीसह भाजपने आपल्यात विलीन केल्यामुळेच तेथील कम्युनिस्ट राजवटीचा पराभव करता आला. महाराष्ट्रातही तेच घडले. त्याचे शेवटचे टोक म्हणजे पालघरची पोटनिवडणूक. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भाजपने उपेक्षाच केली. वनगा यांचे पुत्र आता शिवसेनेकडून पालघरची पोटनिवडणूक लढत आहेत म्हटल्यावर भाजपचा काँग्रेजी आत्माराम जागा झाला व काँग्रेसचा ‘ओरिजनल पहिल्या धारेचा माल’ असलेल्या राजेंद्र गावीत यांना भाजपवासी करून काँग्रेसला पालघरातून मुक्त केले. भाजपने काँग्रेसला जिवंत ठेवले आहे ते असे. ‘काँगेसमुक्त भारता’साठी भाजपने केलेल्या या त्यागाचे मोल अनमोल आहे. त्यासाठी भाजपची पाठ थोपटावीच लागेल!