मुंबई - निवडणुकांदरम्यान जनतेवर करण्यात येणाऱ्या आश्वासनांच्या बरसातीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर निवडणूक प्रचाराच्या घसलेल्या पातळीवरुनही त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसवर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ''सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली मोदी यांनी हेच सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले? जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे'', अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे जनतेला ऊब मिळेल काय? निवडणुकीत आपण जी आश्वासने देतो ती ‘जुमलेबाजी’ ठरू नये याची काळजी यापुढे सगळ्यांनीच घेणे गरजेचे आहे. - जनतेला मूर्ख बनवण्याचे हे धंदे आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात त्याच जुमलेबाजीचा धुरळा उडवला गेला व उद्या महाराष्ट्रातही काही वेगळे घडेल असे आम्हास वाटत नाही. - सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. - 2014 साली मोदी यांनी हेच सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. - सरकार आणि विरोधी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा दुष्काळावर काय उपाययोजना करता येईल, गुरांचा चारा, पाणी, कडबा, शेतकर्यांचे सुरू झालेले स्थलांतर यावर काय तोडगा काढता येईल ते पाहावे लागेल. - फक्त निवडणुकांमागून निवडणुका जिंकायच्या व त्यातच समाधान मानायचे ही एक प्रकारे भांगेची नशा आहे. त्या भांगेसाठी प्रचंड काळा पैसा ओतला जात आहे. मग नोटाबंदीचे काय झाले व सर्वच काळा पैसा खतम करू या घोषणेचे काय झाले? - सभा यशस्वी करण्यासाठी गर्दी विकत घेतली जाते. तसे विजयही तराजूत तोलून विकत घेतले जातात. हे आणखी किती काळ चालणार? धर्माचे म्हणाल तर या देशाला एकमेव धर्म आहे तो हिंदू धर्म. याचा अर्थ येथे इतर धर्मांना स्थान किंवा महत्त्व नाही असे आम्ही म्हणत नाही. - संपूर्ण देशात जातीय मतमतांतराचा जो धुरळा उडाला आहे व त्यातून मने कलुषित झाली आहेत. त्यामुळे देशाला भोके पडत आहेत. त्या भोकांची भगदाडे होऊ नयेत यासाठीच हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आज तरी आहे. - लोक जातीपातीचे झेंडे घेऊन मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात. हा आजपर्यंत ज्यांनी राज्य केले त्यांच्या धोरणांचा, योजनांचा व अर्थकारणाचा पराभव ठरतो. काँग्रेसने मागच्या काळात काही केले नाही म्हणून तुमच्या पाच- दहा वर्षांच्या कालखंडात काही करायचे नाही किंवा आज जे बरे झाले नाही त्याचे खापरही मागच्यावर फोडायचे ही राजकीय संस्कृतीच देशाला घातक, मारक ठरत आहे.