मुंबई - एक्झिट पोलच्या अंदाजांनी एनडीएच्या बाजूने कौल दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपा आणि मित्रपक्षांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमागे खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे ते अमित शहा यांनी आज बोलावलेल्या भाजपाच्या मित्रपक्षांच्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामागे कुठलीही नाराजी नाही. सध्या शिवसेनेचे काही नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत, तरीही काही नेते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले.
NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 11:34 IST