लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपसोबत जाण्यासाठी अनेकदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ते सुद्धा भाजपसोबत जाण्यास राजी होते. परंतु त्यांच्या करणी व कथनीत फरक होता. गेल्यावर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबनाच्या घटनेमुळे भाजप श्रेष्ठी नाराज होते. एकीकडे युतीच्या गोष्टी करायच्या व दुसरीकडे आमदारांवर कारवाई, हे दुटप्पी धोरण उद्धव ठाकरे यांचे होते, असा गंभीर आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली. १८ खासदारांपैकी १२ जणांचा गटनेता म्हणून शेवाळे यांना पाठिंबा असल्याने गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नियुक्ती करण्याचे सुचविले आहे. यावर लोकसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्व खासदारांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश अध्यक्षांनी भावना गवळी यांना दिले.
शिवसेनेचे सध्याचे गटनेते विनायक राऊत यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे बहुसंख्य खासदारांनी एकत्र येऊन नेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळा गट किंवा पक्ष स्थापन केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले... कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच
तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण ते बाण चालविण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? ते धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला तुरुंगात टाकायचे, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. अशा पद्धतीने भाजपला शिवसेना संपवायची आहे. पण तुम्ही सतर्क राहा. आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हेही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरू पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करू, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.
आम्ही पक्ष फोडला नाही
जनतेच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष तोडलेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. शिवसेनेचा नेता म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे. शिवसेना पक्षप्रमुख आपण नाही. आम्ही शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केलेला नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
अद्यापही आम्ही एनडीएतच
शिवसेना एनडीएचा घटकपक्ष आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले नव्हते तसेच यूपीएमध्ये शिवसेना सामील होणार असल्याचे पत्र दिलेले नव्हते. त्यामुळे शिवसेना अद्यापही एनडीएचा घटक पक्ष आहे. हेच धोरण आम्ही पुढे नेत आहोत. - राहुल शेवाळे, खासदार
भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे
भाजपला केवळ शिवसेना तोडायची नाही तर त्यांनी महाराष्ट्राचे तीन तुकडे करावयाचे आहे, असे भाजपचे नेते उघडपणे बोलत आहेत. भाजपचा हा डाव लपून राहिलेला नाही. यासाठी पहिल्यांदा शिवसेना संपविणे आवश्यक आहे. यासाठी भाजपचा हा डाव सुरू आहे. पण शिवसेनेच्या चिन्हावर, ताकदीवर निवडून आलेले आमदार, खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील आणि आज ज्यांच्या घराबाहेर पहारे आहेत त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करू. - संजय राऊत, खासदार
जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रकार
महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप सरकार स्थापन करण्याबाबत गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती, हा दावा हास्यास्पद आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. घेतलेल्या भूमिकेला काहीतरी मुलामा ते देत आहेत. भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना हिणवले, आदित्य ठाकरे यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, याची उत्तरे आधी शिंदे समर्थकांनी द्यावीत. - खा. अरविंद सावंत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते
सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, दि. २० रोजी सुनावणी होणार आहे. तत्कालीन उपाध्यक्षांनी १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भात पाठविलेल्या नोटिसीविरुद्ध शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली आहे.
- याशिवाय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दाखल याचिकांवरही आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल.
- या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.