नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने मूळ शिवसेना म्हणून मान्यता मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कार्यवाहीविरुद्ध शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
वडनिणूक आयोगाने अलीकडेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर आपआपले म्हणणे सादर करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत दस्तऐवज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि निवडणूक आयोगाला पक्षकार बनविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या अर्जावर सध्या सुनावणी घेऊ नये अशी मागणी केली आहे. ताज्या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने म्हटले आहे की, शिंदे गटाकडून पक्ष आणि चिन्हाबाबत करण्यात आलेली मागणी म्हणजे त्यांचा उतावळेपणा आहे.