मुंबई: जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी आज संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलं आहे. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यानं उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला जाणार नाहीत. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेगौडा यांचं अभिनंदन केलं. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचं उद्धव यांनी देवेगौडा यांना सांगितलं. याबद्दल त्यांनी देवेगौडा यांच्याकडे दिलगिरीदेखील व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल भाष्य करत देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या. 'उद्धव ठाकरे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे निमंत्रण असूनही ते शपथविधी सोहळ्याला जाऊ शकणार नाहीत. मात्र त्यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या आहेत,' असं राऊत म्हणाले. एच. डी. देवेगौडा यांच्या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून एकी दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे. या कार्यक्रमाला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत.
...म्हणून उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 12:27 PM