उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:45 IST2025-01-09T09:10:48+5:302025-01-09T11:45:02+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला
Delhi Assembly elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तुटल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसनंतर आता आणखी एका पक्षाने काँग्रेसला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ममता बॅनर्जींपाठोपाठ दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला. दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी लढत होताना दिसत आहे. अशातच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला समर्थन दिलं आहे. उद्धव गटाचे खासदार अनिल देसाई या संदर्भात माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्ष असून दिल्लीत आम आदमी पक्षाविरुद्ध काँग्रेस निवडणूक लढवत असल्याबद्दल बोलताना अनिल देसाई यांनी आम्हाला आशा आहे की दिल्लीत मतांचे विभाजन होणार नाही, असं म्हटलं.
यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आप आणि काँग्रेसला एकत्र येण्याचा सल्ला दिला होता. "आम आदमी पक्ष आणि काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले, त्यामुळे मोदींना रोखण्यात आम्ही यशस्वी झालो, पण विधानसभेत ज्या प्रकारे फ्री स्टाइल कुस्ती सुरू आहे, ती देश पाहत आहे. चार वर्षांनंतर जनता आम्हाला प्रश्न करेल. आमचा शत्रू भाजप आहे, काँग्रेस किंवा आप नाही. आपण एकत्र राहिलो तरच देशाला पुढे नेऊ शकतो," असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. "दिल्लीतील लोकांसोबत होणारा भेदभाव आपण पाहिला आहे. मी अरविंद केजरीवालजींचे अभिनंदन करतो की एवढे होऊनही त्यांची हिंमत कमी झालेली नाही. समाजवादी पक्ष पूर्ण जबाबदारीने तुमच्या पाठीशी उभा आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जेव्हा तुम्हाला समर्थन आणि मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू," असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.
यासोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही आपला पाठिंबा जाहीर केला. तृणमूल नेते कुणाल घोष म्हणाले की, आम्हाला आशा आहे की दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टीचे सरकार येईल. दिल्लीत भाजप संपूण जाईल.
दरम्यान, दिल्लीत आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. दिल्लीतील सर्व ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. गेली १० वर्षे दिल्लीत आपची सत्ता आहे.