नवी दिल्ली - देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, भाजपला चांगलाच झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये 9 मुख्यमंत्री हे भाजपेत्तर पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत एम.के. स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे पिनराईन विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना अनुक्रमे 3, 4 आणि 5 वे स्थान मिळाले आहे. अकरा जणांच्या या यादीत भाजपचे केवळ 2 मुख्यमंत्री असून हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांना स्थान मिळाले आहे.
दरम्यान, इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांनी कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतासाठी सर्वात उपयुक्त पंतप्रधान कोण असेल? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यात, ऑगस्ट 2021 मध्ये केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली आहे. दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के तर ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली होती. मात्र, या महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली आहे.
प्रश्नमच्या सर्वेक्षणातही उद्धव ठाकरेच लोकप्रिय
प्रश्नम यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले होते. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती. या १३ राज्यांतील १७ हजार ५०० जणांनी सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये, कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढीलवेळी हेच मुख्यमंत्री हवेत, असे पर्याय देण्यात आले होते.