राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालिसा वाचू दिली नाही, यामुळे आपली धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हरियाणाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. तसेच यावरून उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विरेश शांडिल्य यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली. राणा दाम्पत्याला जी वागणूक देण्यात आली, यावरून आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
नवनीत राणांच्या आरोपांची पोलखोल...कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असे आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. यानंतर गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितला. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
राणांकडून गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्रखासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले. "मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला."