नवी दिल्ली : सध्या अयोध्येतील राम मंदिरावरुन राजकारण सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपावर सडकून टीका केली आहे. यावर, भाजपाच्या नेत्या उमा भारती म्हणाल्या की, राम मंदिर हे सर्वांचे आहे. उद्धव ठाकरे यांचे राम मंदिरासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही.
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे जाहीर आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दिले. दरम्यान, भाजपाच्या नेत्या उमा भारती होशंगाबाद येथे प्रचारसभेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्या म्हणाल्या, 'उद्धव ठाकरे यांचे राम मंदिरासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा.'
दरम्यान, अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा, असा अल्टिमेटम उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला आहे. याचबरोबर, मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे, याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, मला आज तारीख हवीय. बोला, कधी उभारताय राम मंदिर, असा सवाल त्यांनी केला.