Uddhav Thackeray Shiv Sena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी नवी दिल्ली इथं एकत्रित पत्रकार परिषद घेत पक्षांतराच्या चर्चेचं खंडन करत शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार केला आहे. "आम्ही सर्व पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहोत. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या बाजूला सारण्यासाठी मुद्दाम अशा पुड्या सोडल्या जात आहेत," असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या "मिशन टायगर"ला प्रतिसाद देत उद्धव ठाकरेंचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात होता. यासंबंधीच्या बातम्याही सर्वत्र प्रकाशित झाल्या. मात्र या बातम्यांमुळे आमच्या मतदारसंघांमध्ये आमच्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार अरविंद सावंत यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे असल्याचं सांगितलं.
दरम्यान, "आमच्या खासदारांविषयी संशय तयार करू नका. आमची वज्रमूठ आहे आणि टायगर जिवंत आहे. सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशा बातम्या पेरल्या जात आहेत," असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.