नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची, यावर सध्या निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असून, सोमवारच्या सुनावणीत निर्माण झालेला शिवसेना पक्षप्रमुखपदाचा मुद्दा आता नव्याने चर्चेला आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत येत्या २३ जानेवारी २०२३ ला संपणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी निवडणूक घ्यावयाची की कसे, याबाबत ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे.
गेल्या जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यानंतर मूळ शिवसेना पक्षावरही दावा केला आहे. मूळ शिवसेनेच्या कार्यसमितीची प्रतिनिधी सभा २३ जानेवारी २०१८ रोजी झाली होती. यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड केली होती. ही निवड पाच वर्षांसाठी होती. ही मुदत येत्या २३ जानेवारीला समाप्त होत आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले आहे. दोन्ही गटांना नव्या नावांनी अंतरिम पक्ष स्थापन करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार दोन नव्या पक्षांची स्थापना झाली व नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. ठाकरे गटाच्या अंतरिम पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर शिंदे गटाच्या पक्षाचे नाव (बाळासाहेबांची शिवसेना) असे आहे.
आयोगाकडे नवा मुद्दा
खऱ्या शिवसेनेवर दावा करण्यासाठी दोन्ही गट सध्या निवडणूक आयोगापुढे आपापली बाजू मांडत आहेत. २३ जानेवारीला समाप्त होत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीसाठी नव्याने निवडणूक घेण्याची आवश्यकता आहे. हा मुद्दा घेऊन ठाकरे गटाचे नेते पुन्हा आयोगाकडे गेले. याबाबत निवडणूक आयोगाने योग्य निर्देश द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.