बेळगाव : बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमावर्ती जिल्ह्यात उमटले. संतप्त जमावाने कर्नाटकी वाहने व व्यावसायिकांची दुकाने लक्ष्य केली. दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर, आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी यु टर्न घेतला. शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही आपल्या देशाचे आदर्श असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कडक शब्दात इशारा दिला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते. त्यामुळे, महाराष्ट्रासह कर्नाटकातही याचे तीव्र पडसाद उमटले. मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील वाहनांवर दगडफेक करीत दोन वाहनांची तोडफोड केली. राज्यभरातून या घटनेचा आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हा अनादर खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. आता, बोम्मई यांनी आपल्या विधानावरुन युटर्न घेतला आहे.
शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही स्वातंत्र्य सैनिक आणि आपले आदर्श आहेत. मी दोन्ही महापुरुषांचा आदर करतो अन् त्यांचे अनुकरण करतो. मात्र, काही समाजकंटकांडून भाषेच्या आधारावरुन समाजात तेढ निर्माण करण्याचं आणि तणावाचं वातावरण करण्यात येत आहे. तसेच, या घटनेसंबंधित कर्नाटकात आत्तापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आल्याचंही बोम्मई यांनी सांगितलं.
काय झाली घटना?
कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवभक्त रस्त्यावर उतरले आणि दगडफेक सुरु केले. बंगळुरुतील एका चौकातील पुतळा आहे. कानडी व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटले.
मीरज-कोल्हापूरात तणाव
मिरज पंचायत समिती आवारातील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा दिला.
केंद्राने दखल घ्यावी - संभाजीराजे
लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लुंगी फाडून, तर उस्मानाबादमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीने कर्नाटकचा झेंडा जाळून शनिवारी निषेध नोंदविला. कन्नड रक्षक वेदिकेच्या पुतळ्याचेही दहन केले. सोलापुरात शिवप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत निदर्शने केली. त्यांच्या या वक्तव्यावरुनही शिवप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवछत्रपतींच्या मूर्ती विटंबनेच्या प्रकाराची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे - मुख्यमंत्री
शिवरायांचा कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालावे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री