नवी दिल्ली : भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभेत नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून कालपासून संसदेमध्ये गदारोळ उडाला आहे. आज काँग्रेसच्या खासदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. तर भाजपाने ठाकूर यांना संरक्षण खात्याच्या सल्लागार समितीतून काढून टाकले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस असे म्हटले आहे.
बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. यावेळी भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांना थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण कसे काय देऊ शकता, असा सवाल केला होता. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या प्रकाराबद्दल भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल.
राहुल गांधी यांनी ट्विट करताना दहशतवादी प्रज्ञाने दहशतवादी गोडसेला देशभक्त म्हटले आहे. हा संसदेच्या इतिहासातील वाईट दिवस आहे, असे म्हटले होते. यावर भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी प्रत्यूत्तर देताना, ''राहुल गांधी तुम्ही ढोंगीपणा थांबवा, तुम्ही महाराष्ट्रात यासारख्याच विचाराच्या लोकांसोबत सरकार बनवत आहात. सामनाचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांनी गोडसे राष्ट्रभक्तच असल्याचे म्हटले होते. यामुळेच तुम्हाला त्यांच्या शपथविधीला जाण्याची लाज वाटत आहे का, असा सवालही केला आहे.
सामनामध्ये डिसेंबर 2010 ला नथुराम गोडसे हा देशभक्त होता असे छापल्याचे राव यांनी म्हटले.