नवी दिल्ली - उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपा नेत्यांबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. यासोबतच गंभीर आरोप देखील केला आहे. "पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली (Arun Jaitley) आणि सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा मृत्यू झाला" असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच दरम्यान स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानावर सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या मुलींनी आता उत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदींवर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचं विधान चुकीचं आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या विधानाने आम्ही दुखावलो आहोत" असं बांसुरी स्वराज यांनी म्हटलं आहे.
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते" असं म्हटलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी "सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
एका सभेत बोलत होते. पंतप्रधान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचं देखील म्हटलं आहे. "तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सातत्याने विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता राहुल यांनी मोदी आणि अमित शहांवर (Amit Shah) निशाणा साधला आहे. "तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोदी आणि शहांच्या पाया पडताना पाहणं असह्य" असल्याचं म्हणत राहुल यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "भाजपामध्ये मोठ्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांपुढे वाकावं लागतं" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे.