इम्फाळ: मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये एक विचित्र घटना घडली. इम्फाळच्या विमानतळावरुन अज्ञान वस्तू उडताना दिसली. अनेकांनी या अज्ञानत वस्तूला UFO म्हटले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने (IAF) आपली दोन राफेल लढाऊ विमाने या UFO शोधात पाठवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सूमारास इम्फाळ विमानतळावर एक कथित UFO दिसला. एअर ट्रॅफिक सर्व्हिस (ATS) चे कर्मचारी, एअरलाइन्स कर्मचारी, सामान्य नागरिक, पोलीस आणि CISF च्या जवानांनी इम्फाळ विमानतळावर ही घटना पाहिली. ही वस्तू एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या छतावर घिरट्या घालताना दिसली.
यामुळे काही व्यावसायिक उड्डाणेही प्रभावित झाली. संरक्षण सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, इम्फाळ विमानतळाजवळ UFO ची माहिती मिळाल्यानंतर लगेचच जवळच्या एअरबेसवरुन राफेल लढाऊ विमान त्याचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले.
प्रगत सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या विमानाने संशयित क्षेत्रावरून UFO शोधण्यासाठी खूप कमी उंचीवर उड्डाण केले, परंतु त्यांना काहीच आढळले नाही. पहिले विमान परतल्यानंतर काही वेळानंतर आणखी एक राफेल लढाऊ विमान पाठवण्यात आले. त्या विमानालाही काही आढळले नाही. सध्या या विचित्र घटनेचा शोध घेतला जात आहे.