नवी दिल्ली : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात नोकरीची संधी दिली जाणार नाही. यासंदर्भात अधिसूचना जारी करताना, पाकिस्तानमध्ये घेतलेल्या शैक्षणिक पदवीला भारतातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती UGC (विद्यापीठ अनुदान आयोग) आणि AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) ने दिली आहे. तसेच, अशा विद्यार्थ्यांना रोजगार संधीसाठी पात्र मानले जाणार नाही. जनतेला दिलेल्या नोटीसनुसार "सर्व भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे".
पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्यांना या निर्बंधातून सूट दिली जाईल. पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि भारतीय नागरिकत्व असलेल्या त्यांच्या मुलांना भारतात रोजगाराची संधी दिली जाईल, पण त्यासाठी त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (MHA) सुरक्षा मंजुरी मिळाली पाहिजे. अधिसूचनेत भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात जाण्याचे टाळण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) हा केंद्र सरकारचा एक आयोग आहे, ज्याद्वारे विद्यापीठाला मान्यता दिली जाते. हे मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अनुदान देते. अशा परिस्थितीत यूजीसीची ही अधिसूचना अत्यंत महत्त्वाची ठरते. रात्री उशिरा आलेल्या यूजीसीच्या या आदेशावर अध्यक्ष प्राध्यापक एम जगदेश कुमार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.