UGC NET Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने 15 जानेवारी रोजी होणारी UGC NET परीक्षा पुढे ढकलली आहे. NTA ने सांगितले की, बुधवार (15 जानेवारी 2025) रोजी होणारी UGC NET परीक्षा पोंगल आणि मकर संक्रांती सणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएचे म्हणणे आहे.
तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री गोवी चेझियान यांनी केंद्र सरकारला पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर 14-16 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा शेड्युल करण्याची विनंती केली होती. त्यांनी या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना एक पत्र देखील लिहिले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, 'NTA ने UGC NET डिसेंबर 2024 ची परीक्षा 3 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान शेड्यूल केली आहे. पोंगल 14 जानेवारीला असला तरी, त्यानंतर 15 जानेवारीला तिरुवल्लुवर दिवस (मट्टू पोंगल) आणि 16 जानेवारीला शेतकरी दिन (उझावर थिरुनल किंवा कानुम पोंगल) येतो.
तमिळनाडू सरकारने 14 ते 16 जानेवारी 2025 पर्यंत पोंगल निमित्त सुटी जाहीर केली आहे, असेही ते म्हणाले होते. पोंगलच्या सुटीत नेट परीक्षा घेतल्यास सणाच्या काळात परीक्षेच्या तयारीला अडथळा निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
प्रवेशपत्र जारीNTA ने अलीकडेच 15 आणि 16 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केले होते आणि उमेदवारांना UGC NET ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला दिला होता.
85 विषयांसाठी परीक्षा UGC NET 2024 परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 85 विषयांसाठी घेतली जात आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जात आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर 1 मध्ये 100 गुणांचे 50 प्रश्न असतात, तर पेपर 2 उमेदवाराने निवडलेल्या विषयावर 200 गुणांचे 100 प्रश्न असतात.