नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उज्जैनमध्ये गुरुवारी एका लग्नात सप्तपदी सुरू असताना नवरदेवाची पहिली पत्नी पोहोचली. उज्जैन येथील विक्रम नगरमध्ये हे लग्न सुरू होतं. महिला पतीचं लग्न थांबवण्यासाठी पोलिसांना घेऊन पोहोचली. यानंतर नवरदेवाला वरात घेऊ राजस्थानला परतावं लागलं. पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मंडपात एकच गोंधळ सुरू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरीश गौड राजस्थानमधील प्रताप गडच्या चौकडी गावात राहतो. दोन वर्षांपूर्वी त्याचं मंदसौर येथील पूजा नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक सुरू होतं. मात्र काही दिवसात सासरची मंडळी पुजाला हुंड्यावरुन त्रास देऊ लागली. साधारण 3 महिन्यापूर्वी पूजाची सासू नंदू बाई, सासरे बाबूलाल गौड, पती हरीश यांनी तिला घरातून काढून टाकलं होतं.
पूजा गेल्यानंतर हरीशचे लग्न उज्जैनच्या सपना दायमासोबत निश्चित झाले. सपना ही विक्रम नगर स्थानकाजवळील भृतहरी नगरमध्ये राहते. हे लग्न निश्चित झाल्यानंतर आरोपी हरीश गौरच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या पत्रिकेचे वाटप केले. काही दिवसांपूर्वी ही पत्रिका पूजाचे वडील देवी लाल यांच्या हातात आले. लग्नाची पत्रिका पाहून त्यांना धक्काच बसला.
लग्नाची तारीख 10 फेब्रुवारी 2022 लिहिली होती. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली आणि मंदसौर एसपीकडे तक्रारही केली. त्यानंतर पूजाने प्रतापगड पोलीस ठाण्यात सासू नंदूबाई, सासरा बाबूलाल आणि पती हरीश यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.