नवी दिल्ली - मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिस्त शिकवणाऱे शिक्षकच एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळालं. एका महाविद्यालयातील हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाविद्यालयाचे एक सहाय्यक प्राध्यापक थेट मुख्याध्यापकांना मारहाण करताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओ हा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयातीलच आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुख्याध्यापक आणि संबंधित प्राध्यापक यांच्यातील हाणामारी झाल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही उज्जैन जिल्ह्यातील घटिया तहसली कार्यालय हद्दीत असणाऱ्या स्वर्गीय नागुलाल मालवीय महाविद्यालयात घडली आहे. घटनेतील सहाय्यक प्राध्यापकाचं ब्रह्मदीप आलूने असं नाव आहे. तर मुख्याध्यापकांचं डॉक्टर शेखर मेदमवार असं नाव आहे. मारामारीचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्य़े आधी प्राध्यापक आणि मुख्याध्यापक समोरासमोर खुर्चीवर चर्चा करत बसलेले असतात. यावेळी प्राध्यापक उठतो आणि मुख्याध्यापकांच्या कानशिलात लगावतो.
प्राध्यापक तो टेबलवर जे सापडेल ते हातात धरतो आणि मुख्याध्यापकांच्या अंगावर मारुन फेकतो. तो एवढ्यावरच थांबत नाही तो मुख्यध्यापकांना पुन्हा मारहाण करण्यासाठी त्यांच्याजवळ जातो. यावेळी दोघांमध्ये हाणामारी होते. त्यांच्या या हाणामारीचा आवाज ऐकू आल्यानंतर काही विद्यार्थी आतमध्ये येतात. ते दोघांचं भांडण मिटविण्यासाठी प्रयत्न करतात. महाविद्यालयात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यध्यापक डॉक्टर शेखर मेदमवार यांनी आपली बाजू मांडली आहे.
दुसरीकडे प्राध्यापकांनी मुख्याध्यापकावर स्टाफसोबत गैरवर्तवणूक करण्याचा गंभीर आरोप केला आहे. "मेदमवार यांच्या कार्यकाळात तीन जणांनी वेळेआधी सेवानिवृत्ती घेतली आहे. ते स्टाफसोबत अतिशय गैरवर्तवणूक करतात. त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं आणि अपशब्दांचा प्रयोग केला. त्यातूनच आमच्यात भांडण झालं" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.