ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पाकिस्तानात अडकलेली भारतीय महिला उज्मा मायदेशी भारतात परतली आहे. पाकिस्तानात बंदुकीचा धाक दाखवून तिला लग्नास भाग पाडण्यात आलं होतं. बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानी नागरिक ताहिर अलीने बळजबरीने तिच्याशी लग्न केले होते. मायदेशी परतू दिले जात नसल्यामुळे उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला होता.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत केलं असून आतापर्यंत ज्या त्रासाला सामोरं जाव लागलं त्यासाठी माफीही मागितली आहे.
Uzma - Welcome home India"s daughter. I am sorry for all that you have gone through.— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 25, 2017
उज्माने १२ मे रोजी न्यायालयात याचिका केली होती. माझी पहिल्या विवाहापासून झालेली मुलगी भारतात थॅलीसीमियाने आजारी असल्यामुळे मला मायदेशी जाण्याची मुभा द्यावी, अशी विनंती तिने याचिकेत केली होती. अलीनेही याचिका करून मला माझ्या पत्नीची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती केली होती.
Indian woman Uzma returns to India after permission by Islamabad HC; she had said she was forced to marry a Pakistani. pic.twitter.com/1Ulbi2RfnD— ANI (@ANI_news) May 25, 2017
न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांनी बुधवारी दोन्ही याचिकांवर सुनावणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी उजमाला मायदेशी परतण्याची मुभा दिली. न्यायालयाने उज्माची व्हिसा कागदपत्रे तिला परत केली. ही कागदपत्रे अलीने घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याने ती न्यायालयाच्या स्वाधीन केली.
उज्माला भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाघा बॉर्डरवर सोडा, असे आदेश न्यायमूर्तींनी पोलिसांना दिले होते. तू चेंबरमध्ये अलीला भेटू इच्छिेतस का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी उज्मानकडे केली; मात्र तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला. मी केवळ दोन मिनिटांसाठी तिला भेटू इच्छित होतो; मात्र मला मुभा दिली गेली नाही, अशी तक्रार अलीने केली. उज्मा सुनावणीदरम्यान न्यायालयात बेशुद्ध झाल्यामुळे डॉक्टरांना बोलवावे लागले होते.
अलीने उज्माचे आरोप फेटाळून लावत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला की, ती अद्यापही माझी पत्नी आहे. ना तिने तलाक मागितला ना मी तलाक दिला आहे.
उज्मा आणि अली यांची मलेशियात भेट झाली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर ती वाघा बॉर्डरमार्गे एक मे रोजी पाकिस्तानात आली होती. खैबर पख्तुनख्वातील बुनेर भागात जाऊन तिने तीन मे रोजी अलीशी विवाह केला.
नंतर व्हिसाच्या निमित्ताने इस्लामाबादेत येऊन तिने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला. अलीने बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने विवाह केला, असा आरोप करून जोपर्यंत भारतात परतण्याची मुभा मिळत नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नसल्याचा पवित्रा तीने घेतला होता.