लंडन - देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला ब्रिटन कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने दिल्लीतील तिहार जेल सुरक्षित असल्याचे सांगत भारतातून फरार झालेल्यांचं तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे म्हटले आहे. विजय माल्ल्याने याआधी भारतातील जेल असुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच ब्रिटन कोर्टाने मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाच्या खटल्यात दिलेला हा निर्णय विजय माल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तसेच माल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग यामुळे मोकळा होण्याचीही शक्यता आहे.
लंडन हायकोर्टाचे न्यायाधीश लेगाट आणि न्यायाधीश डिंगेमॅन्स यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तिहार जेलमध्ये असलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक संजीव चावला यांच्या जीवाला भारतात कोणताही धोका नाही असे म्हटले आहे. संजीव चावला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह संजीव चावला यांची यामध्ये नावे आहेत. भारताकडून चावलाच्या उपचारासाठी भरवसा मिळाल्यानंतर कोर्टाने आपले हे मत व्यक्त केले. भारतातील जेल हे असुरक्षित असल्याचा दावा याआधी विजय माल्ल्याने अनेकदा केला असून भारतात परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच या निर्णयाने विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.