नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशभरातील कोरोना संसर्गाचा वेग थोडा मंदावत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली असून, भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. या सहाही जणांना अलगीकरणात ठेवले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये देखील कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये परतलं आहे. कुटुंबातील सदस्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. यामध्ये 4 जणांच्या कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंब राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रशासनाकडून चाचण्या केल्या जात आहेत. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानसेवा थांबविली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाने भारतात पाऊल ठेवले आहे. ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरोनाच्या नवसंकरित व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर घातलेल्या बंदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी तसे संकेत दिले. ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना 22 डिसेंबरपासून भारतात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी ही प्रवेशबंदी संपत आहे. त्यानंतरही बंदी कायम ठेवावी किंवा कसे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. तूर्तास तरी बंदी वाढवावी लागेल, असे दिसत असल्याचे पुरी यांनी सांगितले.
ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही - राजेश टोपे
सुदैवाने राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा (स्ट्रेन) एकही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही. युरोप खंडातील बहुतांश देश तिसऱ्या लॉकडाऊनवर गेले आहेत. तेथे कठोर लॉकडाऊन केले जात आहे. आपण त्या स्टेजवर जाऊ नये, असे राज्यातील जनतेला वाटत असेल तर स्वयंशिस्त पाळावी लागेल, आरोग्य यंत्रणेला काम करायला एक मर्यादा राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. टोपे म्हणाले, पुण्यातील एनआयव्ही येथे 43 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, राज्यात ‘यूके’तील स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण या स्ट्रेनचा संसर्गाचा वेग ७० पटीने अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. लोकांनी शिस्त पाळली तर यंत्रणेवर ताण पडणार नाही.