नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ही माहिती दिली आहे. भारत दौर्यावर आलेल्या ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जॉन्सन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतात येतील. दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते.
गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे प्रमुख जॉन मेजर 26 जानेवारी रोजी मुख्य अतिथी म्हणून परेडमध्ये सामील झाले होते. रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 नोव्हेंबरला फोनवरून बोरिस जॉन्सन यांना औपचारिकरित्या आमंत्रित केले होते. यानंतर कथितरित्या पंतप्रधानांना जी -7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, ज्याचे आयोजन पुढील वर्षी ब्रिटेनमध्ये होणार आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानांचा हा प्रस्तावित दौरा ब्रक्झिटच्या पार्श्वभूमीवर असे मानले जात आहे की, ब्रिटन भारतासारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांशी व्यापार संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्यापार कराराशिवाय युरोपियन संघातून बाहेर पडल्यास ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जुलैमध्ये पाच प्रमुख क्षेत्रांना सहमती यावर्षी जुलैमध्ये दोन्ही देशांनी लाइफ सायन्स, इन्फॉरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी), फूड अँड बेव्हरेज, केमिकल्स आणि सर्व्हिसेस या पाच प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्यास सहमती दर्शविली. मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. या दरम्यान, जयशंकर यांनी व्यापार, संरक्षण, शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी डोमिनिक राब यांच्याशी चर्चा केली.