नवी दिल्ली: अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी ब्रिटननं भारताला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या गटात सामील होण्यासाठी भारत पात्र असल्याचं ब्रिटननं म्हटलं आहे. एनएसजीमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता भारताकडे असल्याचंही ब्रिटनचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अणू व्यापारावर निगराणी ठेवण्याचं काम एनएसजीकडून केलं जातं. एनएसजीमध्ये प्रवेश मिळण्याचे अनेक फायदे असल्यानं ब्रिटननं घेतलेली भूमिका भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्याबद्दल ब्रिटन अनुकूल आहे. 'एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता भारताकडे आहे. भारत एक प्रतिष्ठीत देश असून तो एनएसजीचा भाग असायला हवा, अशी आमची भूमिका आहे,' अशी भूमिका ब्रिटननं घेतली आहे. भारताच्या एनएसजी प्रवेशाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय, हे चीननं एकदा स्पष्ट करावं, असं आवाहनही ब्रिटनकडून करण्यात आलं आहे. एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाला चीननं वारंवार विरोध केला आहे. मात्र तरीही भारतानं एनएसजीमधील प्रवेशाचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. यासाठी गेल्याच महिन्यात भारतानं 2+2 संवाद साधला. यावेळी भारत आणि अमेरिकेचे दोन मंत्री भेटले होते. मात्र अद्याप एनएसजी प्रवेशाबद्दल भारताला अमेरिकेकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. मात्र अमेरिकेकडून सहकार्य मिळेल, अशी आशा मोदी सरकारला आहे.
एनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचा भारताला बिनशर्त पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 8:48 AM