विजयवाडा: रशियानं दोन महिन्यांपूर्वी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाची घोषणा केली. त्यानंतर पुढील काही दिवसांत भारतानं युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरू केलं. हजारो भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं. मात्र मूळचा आंध्र प्रदेशच्या असलेल्या एका डॉक्टरांनी भारतात परतण्यास नकार दिला. आता या डॉक्टरांनी मायदेशी परतण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी महत्त्वाची अट घातली आहे.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये असलेल्या डॉ. गिरी कुमार पाटील यांच्याकडे एक जॅग्वार आणि एक बिबट्या आहे. युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन सैन्यानं पाटील यांना ओलिस ठेवलं होतं. मात्र युक्रेनमध्ये घडत असलेल्या घटना बाहेरच्या जगात कोणालाच कळता कामा नये, अशी अट घालत रशियन सैनिकांनी पाटील यांची सुटका केली. यानंतर पाटील यांचं मतपरिवर्तन झालं. ते भारतात परतण्यास तयार आहेत. मात्र त्यांची एक अट आहे.
पाटील यांच्याकडे असलेल्या जॅग्वार आणि बिबट्या यांना भारतात आणण्याची तयारी मोदी सरकारनं दर्शवली आहे. मात्र या प्राण्यांना तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशातच ठेवण्यात यावं आणि तिथेच मलाही राहू द्यावं, अशी पाटील यांची अट आहे. मला आणि माझ्या पाळीव प्राण्यांना हैदराबादमधील नेहरू उद्यागात ठेवा, असा आग्रह पाटील यांनी केला आहे.
गिरी कुमार पाटील हे मूळचे आंध्र प्रदेशातल्या गोदावरी जिल्ह्यातल्या तनुकू शहरातले. यूट्यूबर व्लॉगिंग करणारे गिरी कुमार सोशल मीडियावर जॅग्वार कुमार म्हणून ओळखले जातात. भारत सरकार मला आणि माझ्या पाळीव प्राण्यांना एअरलिफ्ट करण्यास तयार आहे. जॅग्वार आणि बिबट्याला प्राणीसंग्रहालयात ठेवण्याचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयानं दिला. मात्र मी माझ्या पाळीव प्राण्यांना प्राणीसंग्रहालयात एकटं सोडू शकत नाही. त्यामुळे सरकारचा प्रस्ताव मी नाकारला, असं पाटील यांनी गेल्या महिन्यात एका व्लॉगमध्ये म्हटलं होतं.